Saturday, July 26, 2008

Upgradation Of Saahitya Sammelan(Sakaal News)

स्वरूप आणि दर्जा वाढला - संदीप देवकुळे
विद्याधर कुलकर्णी - सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. २५ - ""अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे रूपांतर "विश्‍व मराठी संमेलना'मध्ये झाल्यामुळे त्याचे स्वरूप आणि दर्जा वाढला आहे.
कोणालाही न दुखावता मराठी भाषा आणि साहित्याचे श्रेष्ठत्व जगाला दाखवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू,'' असा विश्‍वास बे-एरिया महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष संदीप देवकुळे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

देवकुळे म्हणाले, ""साहित्य महामंडळाने हे संमेलन सॅन होजे येथे घेण्याचे निश्‍चित झाल्यावर आलेल्या प्रतिक्रियांसंदर्भात आम्ही जागरूक होतो. संमेलनाच्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यासाठी महामंडळाच्या निमंत्रणावरून भारतात आल्यावर या संमेलनासंदर्भात आक्षेप असणाऱ्या सर्वांशी चर्चा केली. दुसऱ्या दिवशीच्या बैठकीस महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना एकत्रितपणे भेटण्याच्या उद्देशातून उपस्थित होतो. आमच्या मंडळाविषयीची माहिती देणे एवढेच त्यामागचे प्रयोजन होते. माझे निवेदन संपल्यानंतर मी तेथून बाहेर पडलो. महामंडळाच्या बैठकीमध्ये आम्हाला स्वारस्य नव्हते. ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांची भेट घेऊन त्यांना भूमिका समजावून सांगितली. या संमेलनाच्या यशासाठी त्यांचा आशीर्वाद घेतला. रत्नागिरीच्या जिल्हा वाचनालयाचे दीपक पटवर्धन, मुंबई मराठी साहित्य संघ, महाराष्ट्र साहित्य परिषद, अखिल भारतीय मराठी प्रकाशक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. संमेलनाच्या यशस्वितेसाठी आम्हाला साहित्यविश्‍वाचा आशीर्वाद हवा आहे.''

संमेलनाच्या तयारीबाबत माहिती देताना देवकुळे म्हणाले, ""सॅन होजे कन्व्हेन्शन सेंटर आणि इंडियन कम्युनिटी सेंटर यासह आणखी दोन ठिकाणांची संमेलन स्थळाच्या दृष्टीने पाहणी केली आहे. महाराष्ट्र आणि भारतातील किमान एक हजार मराठी भाषक आणि जगभरातील एक हजार मराठी जाणणारे या संमेलनाला उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे. या संमेलनास अधिकाधिक लोकांनी उपस्थित राहावे, यासाठी ७५ हजार रुपयांपर्यंतचे "ट्रॅव्हल पॅकेज' देण्याची योजना आहे.''

-------------------------------
"अनुदानाबाबत नंतर निर्णय'
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला राज्य सरकारतर्फे २५ लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. सॅन होजे येथील संमेलनाला सरकारने यापूर्वीच आशीर्वाद दिला आहे. आता "विश्‍व मराठी संमेलन' असे स्वरूप झाल्यामुळे सरकारशी बोलावे लागेल. मात्र, सरकारचे अनुदान घ्यायचे की नाही, याचा निर्णय आमच्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी बोलूनच निश्‍चित करण्यात येईल, असे देवकुळे यांनी सांगितले.
-------------------------------

No comments: