Tuesday, August 19, 2008

Saahitya Sammelan At Maalgund In December

मालगुंडला डिसेंबरमध्ये मराठी साहित्य संमेलनरत्नागिरी, ता. १७ - कोकण मराठी साहित्य परिषदेचे ११ वे कोकण मराठी साहित्य महासंमेलन ६ ते ८ डिसेंबर २००८ या काळात मालगुंड (जि. रत्नागिरी) येथे कवी केशवसुत साहित्यनगरीत होणार आहे. संमेलनाचे अध्यक्षस्थान प्रख्यात कादंबरीकार विश्‍वास पाटील भूषविणार असून, उद्‌घाटन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती कोमसापचे अध्यक्ष पु. द. कोडोलीकर यांनी रविवारी (ता. १७) दिली. मालगुंड येथे १६ ऑगस्टला झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कवी केशवसुत स्मारकाचे उद्‌घाटन करण्यासाठी कृषिमंत्री शरद पवार येणार होते; पण त्या वेळी काही कारणामुळे ते येऊ शकले नाहीत. स्मारकाला भेट देण्याची त्यांची इच्छा महासंमेलनाच्या उद्‌घाटनाच्या निमित्ताने पूर्ण होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनाचे औचित्य साधून ६ डिसेंबरला दुपारी तीनला "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य मंचा'वर उद्‌घाटन सोहळा होणार आहे. त्यापूर्वी दुपारी २ वाजता निघणाऱ्या ग्रंथदिंडीत मालगुंड पंचक्रोशीतील एक हजार विद्यार्थी- विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत. वातावरणनिर्मितीसाठी रत्नागिरी शहरातही ६ डिसेंबरला सकाळी ग्रंथदिंडी निघणार आहे. "पानिपत'कार विश्‍वास पाटील यांनी संमेलनाध्यक्ष म्हणून येण्याचा "कोमसाप'ला शब्द दिला आहे. त्यांची विस्तृत मुलाखत महासंमेलनात साहित्य रसिकांना ऐकायला मिळणार आहे. ताज्या वाङ्‌मयीन विषयांवरील परिसंवाद, दोन कविसंमेलने, कोकणच्या बोलीभाषांचा आविष्कार, मधू मंगेश कर्णिक यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, कर्तृत्ववान महिलांची आत्मकथने, युवाशक्तीचे वाङ्‌मयीन नवे उन्मेष आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची साभिनय मुलाखत असा या महासंमेलनाचा भरगच्च कार्यक्रम आहे. यंदाचा कोकण साहित्यभूषण हा "कोमसाप'चा सर्वोच्च पुरस्कार ज्येष्ठ नाटककार प्र. ल. मयेकर यांना महासंमेलनाच्या समारंभ सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे. संमेलन समितीचे प्रमुख परेन शिवराम जांभळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्व जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत कार्यक्रम ठरविण्यात आले. या महासंमेलनाच्या स्थानिक आयोजन समितीचे कार्याध्यक्ष म्हणून दिलीप ऊर्फ नाना मयेकर आणि प्रमुख कार्यवाहपदी डॉ. विवेक भिडे यांची निवड करण्यात आली. खासदार अनंत गिते, आमदार उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष शांताराम जाधव, पंचायत समिती सभापती सौ. साधना साळवी आयोजन समितीचे सल्लागार आहेत, अशी माहिती श्री. कोडोलीकर यांनी दिली. या वेळी कार्याध्यक्ष महेश केळुसकर, महासंमेलनाचे प्रवक्ते अशोक बागवे, कार्यवाह अशोक ठाकूर, सौ. नमिता कीर, प्रकाश दळवी आदी उपस्थित होते.

Reply

Monday, August 11, 2008

Lies On Saahitya Sammelan ....For How Long....?

खोटारडेपणा तरी किती काळ?

(संतोष शेणई) सॅन होजेला साहित्य संमेलन घेण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ पहिल्यापासून खोटारडेपणानेच वागत आले आहे. घटनेची पायमल्ली करीत निर्णय घ्यायचे आणि नंतर शब्दांचा खेळ करीत मराठी रसिकांना फसवायचे, असे हे वागणे आहे. .......अखिल विश्‍वात "चक दे मराठी' करायचे असल्याने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे पदाधिकारी आणि निवडक सदस्य मराठी साहित्य संमेलनाबाबत चकवेगिरी करीत आहेत. उगाच शंका घेऊ नका रं, आम्हाला सॅन होजेला जाऊ द्या की, असा सूर या मंडळींचा आहे. येथील संमेलन रद्द करून सॅन होजेला संमेलन घेण्याच्या महामंडळाच्या निर्णयाला महाराष्ट्रातून सर्व स्तरांतून विरोध होताच, महामंडळाला एक पाऊल मागे जावे लागले. पण त्यानंतर महामंडळाने चकवा देणे सुरू केले आहे. याबाबत मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, सॅन होजेच्या संमेलनाच्या आड न्यायालयीन वादासारखी काही विघ्ने येऊ नयेत यासाठी महामंडळाची मंडळी दिशाभूल होईल अशी विधाने जाणीवपूर्वक करीत आहेत. खरे तर सॅन होजेच्या संमेलनाला विरोध नव्हताच; पण घटनाबाह्यरीतीने तेथे संमेलन घेऊ नये आणि भारतातील संमेलनाला ते पर्यायी असू नये एवढीच पहिल्यापासून येथील वाचकांची, लेखकांची, प्रकाशकांची मागणी होती. पण महामंडळाला या दोन्ही गोष्टी मान्य नसल्याने सॅन होजेसाठी विमानांचे उड्‌डाण होईपर्यंत हा चकवा कायम राहील. परस्परविरोधी निवेदने कोणत्याही परिस्थितीत सॅन होजेला फेब्रुवारी २००९ मध्ये साहित्य संमेलन घ्यायचेच आणि त्याआधी भारतात संमेलन होऊ द्यायचे नाही, अशी महामंडळाची योजना आहे. त्यानुसारच गेल्या दोन - तीन महिन्यांत महामंडळाचे वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. "भारतातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन रद्द करण्याचा निर्णय झालेला नाही, तर योग्य वेळी म्हणजे २००९ मध्ये ते संमेलन घेण्यात येईल. सॅन होजेला बे एरिया महाराष्ट्र मंडळातर्फे विश्‍व संमेलन होईल. महामंडळ त्याच्या नियोजनात सहभागी होईल. त्यासाठी महामंडळाचे सदस्य स्वखर्चाने जातील,' असे निवेदन पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेने ३० जुलैला वृत्तपत्रांकडे प्रसिद्धीस दिले. २४ जुलैला महामंडळाची बैठक झाल्यावर महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केलेले निवेदन पाहा ः "महामंडळातर्फे सॅन होजेला ८२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याऐवजी पहिले विश्‍व मराठी साहित्य संमेलन घेणार आहोत. हे संमेलन महामंडळाच्या घटनेनुसार आहे. ज्या वर्षी विश्‍व संमेलन असेल त्या वर्षी साहित्य संमेलन नसेल. सॅन होजेच्या संमेलनाला पन्नास मराठी साहित्यिकांना निमंत्रित करण्यात येणार असून त्यांचा खर्च बे एरिया मंडळ करणार आहे.' ही दोन्ही निवेदने वाचली, की महामंडळाच्या मुखंडांनी चालवलेली दिशाभूल लक्षात येईल. यात महामंडळाचे पदाधिकारी खरे बोलत आहेत, की मसापचे पदाधिकारी? महामंडळाच्या औरंगाबाद येथील पदाधिकाऱ्यांनी पहिल्यापासून काही घटनाबाह्य निर्णय घेतले आणि मसापच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला आंधळेपणाने पाठिंबा दिला आहे. या दोन संस्थांच्या संगनमताबद्दल केवळ माध्यमांनीच शंका व्यक्त केली आहे असे नाही, तर महामंडळाच्या अन्य सदस्यांना गृहीत धरून औरंगाबाद व पुण्याच्या प्रतिनिधींनी परस्पर निर्णय घेण्यावर विदर्भ साहित्य संघाने लेखी आक्षेप नोंदवलेला आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. बहुमताने, एकमताने नव्हे... सॅन होजे प्रकरणातील महामंडळाच्या खोटेपणाचे एक एक नमुने पाहूः सॅन होजेला साहित्य संमेलन घेण्यास विदर्भ साहित्य संघ, गोमंतक मराठी सेवक संघ, संमेलनाध्यक्ष म. द. हातकणंगलेकर यांनी विरोध केला होता. छत्तीसगड व मध्य प्रदेश येथील साहित्य संस्थांचाही विरोध होताच. पण बहुमताने सॅन होजेला मान्यता मिळाली होती. तरीही त्या बैठकीच्या इतिवृत्तात हा ठराव क्रमांक चार "सर्वानुमते संमत' असाच नोंदवलेला होता. सॅन होजेला संमेलन दिल्यानंतर आयत्यावेळी अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या विषयात ठराव क्रमांक "९ब'द्वारे बे एरिया महाराष्ट्र मंडळाला संलग्नत्व देण्यात आले होते. मुळात संलग्नत्वाचा विषय असा आयत्या वेळी आणणे योग्य नव्हते. पण "एखाद्या संस्थेला संमेलन देण्यासाठी संलग्नतेची गरज नसते. त्यामुळे संलग्नता व संमेलन यांचा संबंध न जोडता प्रस्ताव मान्य करावा' असे महामंडळाच्या अध्यक्षांनी सदस्यांना सांगितले आणि सदस्यांनी घटनेचा विचार न करता माना डोलावल्या. घटनेचा विचार तुकड्यातुकड्यांनी करता येत नाही, त्यातील परस्पर संबंधित कलमांचा एकत्र विचार करावयाचा असतो. महामंडळाच्या घटनेच्या परिशिष्ट "अ'मधील संमेलनविषयक नियमानुसार संमेलनाची प्रायोजक संस्था संलग्न असण्याची गरज नाही हे खरे आहे. पण मुळात हे नियम घटनेच्या कलम ५ मधील घटक, समाविष्ट व संलग्न संस्थांच्या अधिवेशनाकरिता तयार केलेले आहेत. या नियमांची उद्दिष्टे कलम ३ मधील उद्देशांप्रमाणे आहेत. म्हणजे महामंडळाशी संलग्न संस्थांच्या कार्यक्षेत्रात हे संमेलन व्हावयाला हवे अशी घटनेची पूर्वअट आहे. त्यामुळे सॅन होजेला संमेलन घेण्यासाठी तेथील संस्थेला संलग्नत्व देण्याची आवश्‍यकता होतीच. आळंदीला एमआयटीने संमेलन आयोजिलेले होते, पण ते घेण्यापूर्वी मसापची आळंदी येथे शाखा सुरू करण्यात आली होती, याची आठवण कर ून द्यावीशी वाटते. म्हणजे आपल्याला हवी ती कलमे तोडून तोडून स्वीकारायची आणि कार्यभाग उरकायचा ही महामंडळाची पद्धत दिसते. मसाप व मुंबईने पहिल्यांदा विदर्भाला साथ दिली नाही. पण त्यांच्या कायदा सल्लागारांनी त्यांची चूक लक्षात आणून देताच पुढच्या बैठकीत त्यांनी बे एरियाचे संलग्नत्व रद्द करण्याची मागणी करून चूक दुरुस्त केलेली दिसते. मात्र तरीही परदेशवारी टाळण्याची त्यांची इच्छा नव्हती. त्यामुळेच त्यांनी हप्पाथप्पाचा खेळ पुणे - औरंगाबादचे भिडू घेऊन सुरू ठेवलेला दिसतो. मसापच्या निवेदनानुसार, शासकीय अनुदान मिळवण्यासाठी ८२ वे संमेलन योग्यवेळी म्हणजे २००९ मध्ये घेतले जाईल. मसापच्या मंडळींचे याबाबतचे ज्ञान कमी आहे असे म्हणावे, की सॅन होजेचे संमेलन होईपर्यंत येथे संमेलन होणार नाही या हमीची योग्य ती काळजी घेणारी जबाबदार (!) मंडळी म्हणावे हेच कळत नाही. सांगली येथील संमेलन २००७ - २००८ या आर्थिक वर्षात झाले होते. म्हणजे रत्नागिरीच्या डिसेंबर २००८ मध्ये होणाऱ्या संमेलनास मान्यता दिली गेली असती तरी २००८ - २००९ या वर्षाचे शासकीय अनुदान मिळण्यात अडचण आली नसतीच. उलट आता मार्च २००९ पर्यंत संमेलन घेतले गेले नाही, तर या वर्षीचे अनुदान बुडू शकते. पण मिळालेल्या माहितीनुसार, आपल्याला जे अनुदान मिळणार नाही, असे सांगितले जाते तेच अनुदान सॅन होजेकरिता मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. सॅन होजेतील संमेलनात बे एरियाला नफा झाला असता तर महामंडळाला वाटा मिळणार नाही, पण तोटा झाला तर महामंडळ त्यात सहभागी असेल असा करार करण्यात आला होता. महामंडळाच्या अध्यक्षांनी केलेल्या या कराराच्या वेळी घटक संस्थांना विचारात घेण्यात आले नव्हते. कोणत्याही संमेलनाचा कार्यक्रम, वक्ते याविषयी महामंडळ निर्णय घेते. पण हे संमेलन त्यालाही अपवाद आहे. बे एरियाला "ग्लॅमरस' वाटणाऱ्या लेखकांची यादी ते देणार आणि मग महामंडळाने त्यांना बोलवायचे, असे ठरले आहे. ५० लेखक आणि महामंडळाचे २० सदस्य यांना बे एरियातर्फे ही वारी घडवली जाणार आहे. या ७० जणांना फक्त आरोग्यविमा, भारतातील प्रवास, व्हिसासाठीचा खर्च स्वतः करावयाचा आहे. महामंडळाचे सदस्य आपल्या खर्चाने जाणार असे म्हणतात, तेव्हा हाच खर्च तर अपेक्षित नसेल? महामंडळ विश्‍व संमेलनाला मदत करणार म्हणजे नेमके काय करणार हे स्पष्ट झालेले नाही. सध्या तरी साहित्य संमेलनाला पर्यायी म्हणून हे संमेलन होणार असल्याने ते अजूनही घटनाबाह्यच आहे. पण येनकेनप्रकारेन रेटून नेण्याचा प्रयत्न महामंडळाचे पुण्या - औरंगाबादचे सदस्य करीत आहेत. या सगळ्या प्रकारात रत्नागिरीच्या नगर वाचन मंदिराच्या कार्यकर्त्यांची त्यांनी घोर निराशा केली आहे. त्यांना झुलवत ठेवून महामंडळाने तोंडघशी पाडले. आता एका संस्थेने केलेला कार्यक्रम एवढेच त्याचे स्वरूप राहील. एकीकडे आपल्या दुराग्रहांपायी घटनाबाह्यरीतीने, मराठी माणसांची मने दुखवून सॅन होजेला संमेलन घ्यायचे आणि दुसरीकडे शक्‍य असलेले व मराठी लोकांनाही हवे असलेले रत्नागिरीचे संमेलन दुर्लक्षायचे? मराठी वाचकांना, लेखकांना, प्रकाशकांना अवमानित करण्यात एका वर्षी हे मुखंड यशस्वी होतीलही, पण यात महामंडळाचे तुकडे होण्याचा आणि संमेलनाची परंपरा बंद पडण्याचा धोका आहे. मराठी माणसाला ते सहन होणारे नाही. प्रकाशकांना दुर्लक्षता येणार नाही महामंडळांच्या परदेशवारीविरूद्ध मराठी प्रकाशक परिषदेने न्यायालयात जायची तयारी केली होती, त्यामुळे महामंडळाच्या मुखंडांनी प्रकाशकांवर तोंडसुख घेतले आहे. महामंडळाच्या आताच्या वैभवशाली संमेलनाची गंगोत्री असलेल्या "मराठी ग्रंथकार सभे'चे पहिले अध्यक्ष न्या. महादेव गोविंद रानडे यांनी संमेलन व प्रकाशक यांचे नाते पहिल्या संमेलनापासून जोडले आहे. दरसाल पाच रुपयांचे ग्रंथ विकत घेण्याची हमी देणाऱ्यांना संमेलनात प्रवेश द्यावा असे त्यांनी सुचवले होते. साहित्य संमेलनात ग्रंथप्रदर्शनाला आता महत्त्व आलेले आहे. मात्र, संमेलनाच्या जोडीने ग्रंथ प्रदर्शन उभारण्याची प्रथा पस्तीस वर्षांपूर्वी सुरू झाली. कोल्हापूरच्या गुलमोहर बुक डेपोचे अरुण गाडगीळ यांनी ही प्रथा सुरू केली, हे किती जणांना आठवत असेल? -------------------------------------------------------- सांगलीच्या संमेलनातही खोटारडेपणा सांगलीत झालेल्या ८१ व्या संमेलनाच्या उद्‌घाटन सोहळ्याच्या तपशिलाबाबत महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून घटक संस्थांना पुरेशी माहिती देण्यात येत नव्हती. काही गोष्टी तोंडी सांगून इतिवृत्तात त्याचा समावेश करण्यात येत नव्हता, तर काही गोष्टी सांगितल्या त्यापेक्षा आयत्या वेळी वेगळ्याच करण्यात आल्या होत्या. महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या या वागण्यामुळे त्या वेळचे मावळते संमेलनाध्यक्ष अरुण साधू यांना सूत्रे न देताच परत जावे लागले होते. महामंडळाचा हा खोटारडेपणा उघड करीत विदर्भ साहित्य संघाने नाराजी व्यक्त केली होती. -------------------------------------------------------- - संतोष शेणई

Saturday, August 9, 2008

What Purpose Would S.F.Sammelan Serve?

एकीकडे मराठी शाळांना , मराठी बोलण्याला उतरती कळ लागली असताना , साहित्य संमेलनाने मात्र थेट साता समुद्रापार झेप घेतली आहे. आगामी ८२ वे आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सान फ्रान्सिस्कोत घेण्याच्या महामंडळाने घेतलाय. ही मराठीची भव्य झेप म्हणायची की एक मराठीच्या नावाने टाकलेला आणखी एक नवा फार्स म्हणायचा ? रविवारी जाहीर झालेल्या या निर्णयाने साहित्यवर्तुळात चांगलीच राळ उठली आहे. साहित्य महामंडळाच्या १३१ वर्षांच्या इतिहासात परदेशात भरवण्यात येणारं हे पहिलं साहित्य संमेलन असणार आहे. ५२ वर्षांपूर्वी श्री.म. माटे यांनी मराठी साहित्य संमेलन परदेशामध्ये भरवण्याची इच्छा व्यक्त केली होती. हे स्वप्न पूर्ण होणार याचा आनंद व्यक्त करायचा की राज्यातील रसिक या सोहळ्याला मुकणार म्हणून टीका करायची असा सावळागोंधळ सर्वत्र दिसतोय. अमेरिकेतील मराठी बांधवाना याचा आनंद झाला असला तरी भारतातून किती जणांना तेथे पोहचणे जमेल हा वाद तर दिवसेंदिवस अधिकच पेटणार आहे... त्यामुळे भारत आणि अमेरिकेतील अनेक साहित्य रसिकांकडून याचे स्वागत होत असले तरी दुसरीकडे सामान्य माणसाला या संमेलनात सहभागी होता येणार नाही , असा नाराजीचा सूरही निघत आहे. साहित्यिक , आयोजनासाठी उत्सुक असलेल्या इतर संलग्न संस्थांकडून विरोध होत आहे. तर सान फ्रान्सिस्को येथे होणा-या संमेलनाला पर्यायी संमेलन आयोजित करता येईल का , अशीही चाचपणी सुरू झाली आहे. साहित्य संमेलन साता समुद्रापार जाणार याचा आपल्याला आनंद वाटतो का ? संमेलन अमेरिकत भरवण्यात आल्याने मराठी भाषेचा प्रसार होईल असे वाटते का ? दरवर्षी पंढरीच्या वारीप्रमाणे साहित्य संमेलनाला हजेरी लावणा-या साहित्य रसिकांची निराशा होईल का ? केवळ मूठभर साहित्यिक आणि महामंडाळाच्या पदाधिका-यांच्या परदेशवारीसाठी हे संमेलन अमेरिकेत भरवण्याचा निर्णय घेण्यात आला का ? तुम्हांला काय वाटते ? हे आम्हाला जरूर कळवा...

Sunday, August 3, 2008

( Vishwa Marathi ) Geet Sammelan

गीत संमेलन(बण्डा जोशी) एका गरीब कवीला- रेडिओवरची भाषिक गाणी ऐकत ऐकत झोप लागली. संमेलनाचे विचार आणि गाण्यांचे शब्द यांच्या भेळेचं त्याला एक स्वप्न पडलं. जागं झाल्यावर, त्याच्या अल्पमतीप्रमाणे आणि मंदबुद्धीनुसार, त्यानं दोन्ही बाजूंच्या स्वप्नातल्या भूमिका आठवून, गाण्यात खरडून टाकल्या. ........आटपाट राज्य होतं. त्या राज्याची एक "अमृताते पैजा जिंकणारी' भाषा होती. त्या भाषेची "लेकरं', काही देशी (तळ्यात) होती, तर काही विदेशी (मळ्यात). त्या भाषेचं, प्रतिवर्षी संमेलन व्हायचं. एका वर्षी ते विदेशी मळ्यात व्हावं, अशी टूम निघाली. त्या विदेशी मळ्याचं नाव होतं सॅन होजे. मळ्यात जायचं की इथल्या तळ्यात डुंबायचं, यावरून दोन तट पडले. काही जण तटाच्या भिंतीवर बसले. अशा स्थितीत तिथल्या एका गरीब कवीला- रेडिओवरची भाषिक गाणी ऐकत ऐकत झोप लागली. संमेलनाचे विचार आणि गाण्यांचे शब्द यांच्या भेळेचं त्याला एक स्वप्न पडलं. जागं झाल्यावर, त्याच्या अल्पमतीप्रमाणे आणि मंदबुद्धीनुसार, त्यानं दोन्ही बाजूंच्या स्वप्नातल्या भूमिका आठवून, गाण्यात खरडून टाकल्या. आता हे सगळं, काव्याच्या कैफात आणि स्वप्नांच्या गावात घडल्यामुळं, सारं "काल्पनिक' आहे, हे उघड आहे. पण यातली नावं, घटना, संस्था आणि व्यक्तींमध्ये साम्य आढळल्यास तो योगायोग न समजता, कवीचा मूर्खपणा समजावा आणि सोडून द्यावं; राग धरू नये. अनुराग असावा; कारण, कवीचा बाणा आहे- तोंडघशी पडलो तरी बेहत्तर, घ्यायची तर अस्मानउडीच! तशी संमेलनाची अस्मानउडी घ्यायचं ठरवलं- महामंडळानं. तेही अमेरिकेत- सॅन होजेला! तर "मधु'ची अस्वाभाविक "तऱ्हा' अशी की त्यांनी "मंगेशा'च्या "कर्णीकपाळी' रत्नागिरीचा हट्ट धरला. यावर महामंडळाच्या श्रेष्ठींनी विधानसभेत- नव्हे- "विभांसमेत' "जोशा'नं त्यांना विचारलं- (चाल- मधुमागसी माझ्या सख्या परी) ""मधु, मागसी "संमेलना'परी कुठे सॅन-होजे, कुठे रत्नागिरी? संधी कशी ही सोडू वाया पर्वणी आली, विदेशी जाया अता विरोधी सूर कासया "बे-एरियाची' करू वारी।। मधु, मागसी "संमेलना'परी कुठे सॅन होजे, कुठे रत्नागिरी?'' "सॅन-होजेमध्ये, सत्तर लेखकांची, प्रवास-निवास खाण्यापिण्याची व्यवस्था यजमान करणार,' असं ठरलं. पण याचं "कौतिक' जे विदेशी जाण्यासाठी "ठाले' त्यांना हो-! बाकीच्याना त्याचं काय? मग विघ्नसंतोषी पत्रकार कुत्सितपणे म्हणू लागले- (चाल- अशी पाखरे येती) ""असे लेखकु असती, बेटे, सदाच भांडत बसती।। परदेशातिल अंगत-पंगत, त्यास्तव करती कुस्ती।। संमेलनी त्या, तेच चालले "सत्तरा'मध्ये जे जे घुसले रात्री, नंतर, अधांतरी वर विमानाविना उडती।। असे लेखकु असती।। इकडं प्रकाशक मंडळींचं "अर्थपूर्ण' दुःख "सायडिंग'ला पडायला लागलं. मग त्यांनी, आपलं गाऱ्हाणं प्रकाशित केलं- (चाल - मला बी जत्रंला येऊ द्या की) संमेलन इथंच होऊन द्या की रं आम्हाला धंदा करून द्या की।। आम्हाला फायदा घेऊन द्या की रं नाही तर कोर्टात जाऊन्‌ द्या की।। मग, विश्‍व साहित्य संमेलन, सॅन होजेला ठरलं आणि महामंडळाच्या मानकऱ्यांकडं, नवेजुने लेखक आपली वर्णी लावायला लागले. यावर, वैतागून ते मानकरी एका लेखकाला म्हणाले- (चाल - काही बोलायचे आहे) तुला यावयाचे आहे, पण नेणार नाही। सत्तरांच्या यादीमध्ये, तुला घुसवणार नाही।। "त्यां'च्या कृपा"प्रसादाने' झालो दौऱ्याचा धनी तुझा वशिला लावाया, मला जमणार नाही।। सगळ्यांच्या नाकावर टिच्चून, मंडळी सॅन-होजेला निघाली. मग जाणारे, मागं राहणाऱ्यांना म्हणाले- (चाल - जन पळभर म्हणतिल हायहाय) तुम्ही म्हणत बसा रे हाय- हाय। अम्ही जातो, करतो, बाय बाय।। (तिथं काय होईल?) चर्चा झडतिल- कविही गातील, परिसंवादक चऱ्हाट वळतिल खाऊन- पिऊनी, डुलतिल सुलतिल, तोल सोडतिल हातपाय।। आम्ही जातो, करतो बाय बाय।। तिकडं, यजमान सॅन-होजेकर- "संदीप' घेऊन सगळी "देवकुळे' मंडळी, स्वागताला सिद्ध होती, संमेलन घ्यायला अधीर होती- उत्सुक होती. ती आपल्या भाषा-बांधवांना विनवू लागली- (चाल- फटका ससारामधि ऐस आपला उगाच भटकत फिरु नको) "विश्‍वचि अपुले घर' मानी तू, उंबऱ्यामध्ये अडू नको "ज्ञानेशांचा' पाईक हो तू, आम्हास "परके' करु नको कूपमंडुकी वृत्ती सोडुन, ये बाहेरी, भिऊ नको विश्‍वाकाशी घेऊ भरारी, पंख आपले मिटू नको।। ओलांडुन ये, साती सागर, आता मागे हटू नको पुढे चाल रे, मागे राहुन, पाय कुणाचे ओढू नको।। भांडणतंटे करू नको (ती) परंपरा चालवू नको मायमराठी, विसरु नको जरि तू असशी "लोकल' तरिही, ग्लोबल' व्हाया डरु नको।। विश्‍वामधले सर्व मराठी एकी ठेवू, दुही नको।। खडे घाट चढून रत्नागिरीला जायचं, की सात समुद्र ओलांडून सॅन होजे गाठायचं, हा प्रश्‍न अनेक वाचक- साहित्यरसिकांना पडला. यावर, कवीनं "पाडगावकरी' शैलीत सांगितलं- (मूळ कविता- कसं जगायचं, तुम्हीच ठरवा) कसं जायचं, तुम्हीच ठरवा-! खेड घाट चढत, की विमानातनं उडत- तुम्हीच ठरवा! - आपल्यापैकी, ज्याना जमतं-परवडतं, तेच जातात- हे नेहमीचंच! मग यंदा, "आनंदयात्री' होणं, जमवायचं की, भाऊबंदकी करत, गमवायचं, तुम्हीच ठरवा। "माझंच खरं' असंही म्हणता येतं- "त्याचंही चूक नाही,' हेही जाणता येतं-! आता वाद पेटवायचे, की भेद मिटवायचे- तुम्हीच ठरवा-! कोकणात धडकायचं की सॅन होजेत फडकायचं- तुम्हीच ठरवा, तुम्हीच ठरवा! शेवटी, कवीनं ठरवलं- आधी गाठू रत्नागिरी नंतर नेलंच मंडळानं, तर करू सॅन-होजेचीही वारी! आणि टोचत होतं, तरी कवी कुंपणावर बसून राहिला. - बण्डा जोशीfunction CloseWindow() {window.close() }

Saahitya Sammelan In India In 2009

भारतातील संमेलन २००९ मध्ये होणारपुणे, ता. ३० - भारतातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन रद्द करण्याचा निर्णय झालेला नाही, तर योग्य वेळी म्हणजे २००९ मध्ये ते संमेलन घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे कळविण्यात आले आहे. शिवाय पहिल्या विश्‍व मराठी साहित्य संमेलनासाठी महामंडळाचे सर्व सदस्य स्वखर्चाने जाणार असल्याचेही परिषदेच्या पत्रकात म्हटले आहे. परिषदेच्या भूमिकेविषयी विविध माध्यमांतून उलटसुलट चर्चा सुरू असल्याच्या पार्श्‍वभूमीवर हे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. "मसाप'च्या पुण्याच्या, तसेच बाहेरगावच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी झाली. या बैठकीत परिषदेचे विश्‍वस्त, उपाध्यक्ष, पदाधिकारी, बाहेरगावचे प्रतिनिधी उपस्थित होते. महामंडळाच्या औरंगाबाद येथे झालेल्या बैठकीतील निर्णयांची माहिती या प्रसंगी प्रतिनिधींना देण्यात आली. अमेरिकेत होणारे विश्‍वसंमेलन हे अमेरिकेतील मराठी भाषक भरवीत आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ त्याच्या नियोजनात सहभागी होत आहे. मराठीचा झेंडा ते देशाबाहेर मिरवीत असल्याने मराठी भाषक म्हणून "मसाप'चे सदस्य व पदाधिकारी महामंडळाच्या सदस्यांना व पदाधिकाऱ्यांना या संमेलनासाठी पाठिंबा देत आहेत, असे या पत्रकात म्हटले आहे. या संमेलनासाठी महामंडळाचे सर्व सदस्य स्वखर्चाने जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. परिषदेचे अध्यक्ष प्रा. द. मा. मिरासदार यांनी "मसाप'ला दिलेल्या पत्रातही याला दुजोरा दिला आहे. ""संमेलन प्रामुख्याने मराठी रसिकांसाठी असल्याने ते महाराष्ट्रातीलच एका गावी भरविले जाण्यास अग्रक्रम द्यावा, तथापि सॅनफ्रान्सिस्को येथील मराठी बांधवांनी यासंबंधी दाखवलेला उत्साह आणि कळकळ ध्यानी घेऊन तेही निमंत्रण स्वीकारावे. महाराष्ट्रातील संमेलन हे अधिकृत ८२ वे संमेलन होईल आणि अमेरिकेतील संमेलनास "विशेष साहित्य संमेलन' म्हणावे, म्हणजे हा वाद मिटू शकेल. महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी ही सूचना विचार करण्याजोगी आहे, असे म्हटले आणि महामंडळाच्या आगामी बैठकीत काही दुरुस्त्यांसह ती ठेवतो, असे म्हटले. नुकतीच महामंडळाची बैठक झाली आणि महाराष्ट्रातील संमेलनाचा अग्रक्रम मान्य करून ते २००८ ऐवजी २००९ मध्ये घ्यावे, असे म्हटले; कारण २००८ मध्ये सांगली येथे संमेलन होऊन गेले आहे. शासकीय आर्थिक वर्ष २००९ च्या मार्चमध्ये संपेल. त्यानंतर हे संमेलन भरल्यास या संमेलनास योग्य ते शासकीय आर्थिक अनुदान मिळू शकेल,'' असे मिरासदार यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. "विश्‍व साहित्य संमेलन' म्हणावे! ""सॅन होजे येथील मराठी मंडळींना हे संमेलन येत्या फेब्रुवारीमध्ये आवश्‍यक वाटते, म्हणून ते फेब्रुवारीस ठरवावे. ते तेथील मराठी मंडळाने भरवावे. मराठी साहित्य महामंडळाने फक्त त्यांना योग्य ते सहकार्य करावे. या संमेलनास "विश्‍व साहित्य संमेलन' म्हणावे, म्हणजे घटनात्मक कुठलीही अडचण येणार नाही. मंडळाचे जे सदस्य या विश्‍व संमेलनास जातील, त्यांनी स्वखर्चाने जावे, असेही ठरले आहे,'' असा उल्लेखही मिरासदार यांनी पाठविलेल्या पत्रात आहे.

Wednesday, July 30, 2008

Saahitya Mahaamandalaache Maalak,Sammelanaache Thekedaar


महामंडळाचे मालक, संमेलनाचे ठेकेदार

(संतोष शेणई) अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा गेल्या महिन्याभरातील कोलांटउड्यांचा खेळ घृणास्पद आणि उबग आणणारा आहे. ........अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने सॅन होजे येथे ८२ वे मराठी साहित्य संमेलन घेण्याचा निर्णय मागे घेतला आणि त्याऐवजी त्याच काळात "विश्‍व मराठी साहित्य संमेलन' घेण्याचा घटनाबाह्य निर्णय घेतला. मराठी साहित्य रसिकांचा क्षोभ दूर करण्यासाठी सॅन होजेतील ८२ वे साहित्य संमेलन रद्द करण्यात आल्याचे वाटेल; पण प्रत्यक्षात महामंडळाने केलेली ही फसवणूक आहे. महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा गेल्या महिन्याभरातील कोलांटउड्यांचा खेळ घृणास्पद आणि उबग आणणारा आहे. अमेरिकेतील बे एरिया महाराष्ट्र मंडळाला संलग्नत्व देण्याचा प्रस्ताव महामंडळापुढे २४ मेच्या बैठकीत पहिल्यांदा आला. त्याच वेळी विदर्भ साहित्य संघाने महामंडळाच्या घटनेतील तरतुदींनुसार त्या संस्थेला संलग्नत्व देता येणार नाही हे दाखवून दिले. त्यामुळे त्या वेळी संलग्नत्व देण्यात आलेले नव्हते; पण विदर्भाच्या गैरहजेरीत व गोमंतक मराठी सेवक संघाचा विरोध डावलून २२ जूनच्या बैठकीत सॅन होजेला संमेलन घेण्याचे बहुमताने ठरविण्यात आले. संमेलन घेण्याचे ठरवल्यानंतर आयत्या वेळच्या विषयात बे एरिया मंडळाला संलग्न करण्यात आले. संलग्न नसलेल्या मंडळाला संमेलन द्यायचे आणि नंतर घटनाबाह्य असतानाही त्या संस्थेला संलग्न करून घ्यायचे ही मनमानी झाली; पण महामंडळात ती केली गेली. मलमपट्टीचा प्रयत्न महामंडळाच्या निर्णयाला मराठी साहित्य रसिकांनी प्रचंड विरोध दर्शवल्यावर महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यावर मलमपट्टी शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. रत्नागिरी येथे संमेलन घेण्याचा निर्णय त्यातूनच जाहीर करण्यात आला. प्रत्यक्षात रत्नागिरीचे संमेलन होऊ द्यायचे नाही, हे या कंपनीने आधीच ठरवले होते. फक्त रसिकांचा क्षोभ कमी करण्यासाठी ही हूल दाखवली गेली. आताही सॅन होजेचे "अखिल भारतीय' संमेलन रद्द करण्यात आले, तेही कायदेशीर मुद्दे पुढे आल्यामुळे. बे एरियाच्या संलग्नत्वाबद्दल विदर्भाने जे २४ मेच्या बैठकीत सांगितले होते, तेच पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने आणि मुंबई साहित्य संघाने २४ जुलैच्या बैठकीत कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर मांडले. महामंडळाच्या घटनेत स्पष्ट म्हटले आहे, की भारताबाहेरच्या संस्थेला संलग्नत्व द्यायचे झाल्यास ती त्या पूर्ण देशाची प्रतिनिधित्व करणारी संस्था असली पाहिजे. तसेच त्या संस्थेने मराठी भाषा, साहित्य व संस्कृती याविषयी सातत्याने काम केलेले असले पाहिजे. या दोन्ही अटी बे एरिया मंडळ पूर्ण करू शकत नव्हते. त्यामुळे केवळ कौतिकराव ठालेपाटील व अरुण प्रभुणे यांची इच्छापूर्ती करण्यासाठी संलग्नत्व देता येत नव्हते. ही गोष्ट विदर्भाने आणि गोव्याने लक्षात आणून देऊनही महिन्याभराने "मसाप' व मुंबई यांनी त्याकडे दुर्लक्ष का केले? असे काय घडले, की त्यांना घटनेतील तरतुदींचा वेगळा अर्थ उमगला, की घटनेतील तरतुदी लक्षात घेण्यासाठी नसतातच. आपण काहीही मनमानी करणे हा आपला हक्कच आहे, असे त्यांना वाटले? एक मुद्दा असाही मांडण्यात येत होता, की मराठी साहित्य जागतिक पातळीवर पोचणार असेल तर घटनेतील काही नियमांकडे थोडे दुर्लक्ष झाले तर काय बिघडले? घटना आपल्यासाठीच असते ना! हा मुद्दा वेगवेगळ्या संदर्भात कोणी ना कोणी विचारत असतो. "घटना ही कारभार चालवण्यासाठी असते, मोडून पाडण्यासाठी नाही.' नाथ पै यांचे विधान नेहमीच नीट लक्षात ठेवल्यास बऱ्याच गोष्टी सुरळीत चालू शकतील, एवढेच येथे या महाभागाना सांगेन. या प्रकरणात पुण्याच्या मसापच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका पहिल्यापासून संशयास्पद राहिली. ज्या प्रकरणाची दोन महिने चर्चा सुरू आहे, जी धोरणात्मक बाब ठरू शकते, त्याबाबत "मसाप'च्या कार्यकारिणीचा कौल घ्यावा, असे पदाधिकाऱ्यांना वाटले नाही. दैनंदिन कामकाजाबाबत येणाऱ्या अडचणी निवारण्यासाठी दर मंगळवारी होणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत माहिती देणे एवढेच या विषयाचे गांभीर्य वाटले. परिषदेचे अध्यक्ष द. मा. मिरासदार यांनी वृत्तपत्रातून जाहीर नाराजी व्यक्त केली. परिषदेचे ज्येष्ठ उपाध्यक्ष डॉ. वि. मा. बाचल यांनी नाराजीने राजीनामा देऊ केला होता. त्या वेळी या पदाधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपली तेथे गरज आहे, असे त्यांना विनवावे लागले. परिषदेच्या विश्‍वस्त समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. भास्करराव आव्हाड यांनी महामंडळाच्या घटनेतील तरतुदी अभ्यासून मसापला सल्ला दिला होता; पण महामंडळाच्या बैठकीत मसापच्या पदाधिकाऱ्यांनी हा सल्ला काय आहे हे सांगण्यास आढेवेढे घेतले. गोव्याच्या प्रतिनिधीने "मसाप'ने कायदेशीर सल्ला घेतला आहे, तो वाचावा असे म्हटल्यावरही पहिल्यांदा वेगळेच पत्र वाचून दाखवले गेले. त्यानंतर पुन्हा कायदेशीर सल्ला काय, असे विचारल्यावर नाइलाज असल्यासारखे ऍड. आव्हाड यांचे मत वाचून दाखवण्यात आले. बे एरियाला संलग्नत्व देता येणार नाही, याची माहिती मसापच्या प्रतिनिधींना अगोदरपासून असतानाही ते सॅम होजे येथील संमेलनाचा कार्यक्रम ठरवण्याच्या बैठकीत उत्साहाने सामील झाले. या सगळ्याचा अर्थ काय होतो? मालकशाही कधी संपणार? महामंडळ जगात कुठेही मराठी साहित्य व भाषाविषयक कार्यक्रम करू शकते, या घटनात्मक तरतुदीच्या आधारे विश्‍व संमेलनाची घोषणा झाली; पण त्यानंतर लगेचच अध्यक्षांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरवण्यात आला. आता प्रश्‍न निर्माण होईल की विश्‍व संमेलनाला घटनात्मक पाया निर्माण करण्यात आला का? निवडणूक नियमावली कधी करण्यात आली? त्याला महामंडळाची मान्यता कधी मिळवली? परदेशवारीची एवढी घाई असावी का, की घटना बाजूला सारून कार्यक्षमता दाखवावी? रत्नागिरीच्या संमेलनाची घोषणा घाईघाईने केली गेली होती; पण सॅन होजेचे संमेलन झाल्याखेरीज दुसरे कुठलेही संमेलन घेतले जाणार नाही, अशी हमी महामंडळाने दिली आहे. त्यामुळे रत्नागिरीच्या संमेलनाला वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या जाणार हे त्या घोषणेच्या वेळीच नक्की होते. आताही पहिले विश्‍व संमेलन होईल, पण ८२ वे साहित्य संमेलन कोठे व कधी होणार, हे प्रश्‍न अनुत्तरित आहेत. साहित्य संमेलन हे महामंडळाचे वार्षिक अधिवेशन असते. त्यामुळेच विश्‍व संमेलनाची पळवाटही घटनाबाह्य आहे. तरीही विश्‍व संमेलन होईल त्या वर्षी साहित्य संमेलन होणार नाही अशी घोषणा हेकेखोरपणाने करण्यात आली आहेच. महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची ही मालकशाही कधी बंद होणार? ---------------------------------------------------------- कायदा मोडून लोकशाही टिकत नाही. घटना तोडून संस्था टिकत नाही. - बॅ. नाथ पै ---------------------------------------------------------- - संतोष शेणईfunction CloseWindow() {window.close() }

Monday, July 28, 2008

Saahitya Melaavaa In San Francisco ....?

संमेलन की मेळावा?
28 Jul 2008, 0008 hrs IST

प्रिंट करा सेव करा ई-मेल करा
प्रतिक्रिया नोंदवा


विश्व साहित्य संमेलन होणारच अशी स्पष्ट चिन्हे दिसत असतानाच रत्नागिरी येथे अखिल भारतीय मराठी साहित्य शारदा संमेलन भरवण्याचा झालेला निर्णय हा साहित्यवर्तुळामध्ये वावरणा-यांचा विवेक जागा असल्याचीच ग्वाही देणारा आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ख्यातनाम प्रतिभावंत कवी मंगेश पाडगावकर यांची निवड करण्यात आली आहे आणि ती अतिशय आनंदाची बाब आहे. याबद्दल आम्ही शारदा संमलेनाच्या आयोजकांचे अभिनंदन करतो. याचे कारण असे की, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या होणा-या निवडणुकीमध्ये पडायचे नाही, असे काही ज्येष्ठ प्रतिभावंतांनी नक्की केले आहे. त्यामुळेच श्री. ना. पेंडसे आणि विजय तेंडुलकर यांना हा मान त्यांच्या हयातीत मिळाला नाही आणि विंदा करंदीकर आणि मंगेश पाडगावकर यांनाही तो देण्याचे कोणी आजवर मनावर घेतले नाही. शारदा संमेलनाच्या आयोजकांनी मात्र ही उणीव भरून काढली आहे. पाडगांवकरांची निवड करून आपण संमेलनच भरवणार नाही, तर ते अर्थपूर्णही करणार, असेच जणू त्यांनी सूचित केले आहे. रत्नागिरीतील संयोजक असा विवेक दाखवत असतानाच अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या पदाधिका-यांना मात्र विवेक सोडून गेला असावा. याचे कारण काहीही करून सॅन होजे येथे संमेलन घ्यायचेच अशा निर्धारानेच ते वागत आणि बोलत आहेत.

ज्या रीतीने त्यांनी बे एरियाच्या मंडळाला संलग्नता दिली आणि टीका होताच ती रद्द करून आता तिथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाऐवजी विश्व मराठी साहित्य संमेलन भरवण्याचे ठरविले, त्यावरून विवेकहिन माणसासारखीच महामंडळाची स्थिती झाल्याचे दिसते. या सगळ्या गोंधळामध्ये यंदा अधिकृत असे अ. भा. मराठी साहित्य संमेलन इथे होणारच नाही, असे चित्र आता तयार झाले आहे आणि ते कोणाही साहित्यप्रेमीच्या जिव्हारी लागणारे आहे. मराठी साहित्य संमेलनाला एक प्रदीर्घ अशी अभिमानास्पद परंपरा आहे. एकेकाळी मराठी साहित्य व्यवहारातील लेखक-कवींनी, प्रकाशकांनी-वाचकांनी, साहित्याच्या अभ्यासकांनी-जाणकार समीक्षकांनी एकत्र येऊन जाहीरपणे विचारविनिमय करण्याचे ठिकाण असे या संमेलनाचे रूप होते. त्या वेळी अध्यक्षीय भाषणे कसदार आणि विचारपरीप्लुत असत आणि धनदांडग्यांच्या किंवा राजकारण्यांच्या आशीर्वादाची फारशी गरज तेव्हा भासत नसे. काळाच्या ओघात त्यामध्ये फरक पडत गेला. आता तर ही उरलीसुरली परंपराच मोडीत काढण्याचे अचाट धाडस अखिल भारतीय साहित्य महामंडळ दाखवत आहे. या धाडसातून अमेरिकेमध्ये काही साहित्यिक एकत्र येतील. अमेरिकेतून आणि अन्य ठिकाणांहूनही काही रसिक तिथे जमतील.

मात्र ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नसेल, तर तो एक साहित्य मेळावा असेल. एक दीर्घ परंपरा मोडून आयोजित केलेल्या या मेळाव्याने काही लोकांची चारजणांना एकत्र करण्याची हौस फिटेल. काहींना साहित्यिकांना भेटल्याने कृतकृत्यही वाटेल. काहीना त्यांच्या सहवासाने स्वर्ग लाभल्याचाही भास होईल. तर काहींना, आपण आपले स्वप्न अखेरीस साकार केलेच याचा आनंद होईल. त्यांच्या आनंदामध्ये आम्ही मिठाचा खडा टाकू इच्छित नाही. मात्र या मेळाव्याला अ. भा. मराठी साहित्य संमेलन म्हणता येणार नाही. उलट असे संमेलन भरवण्याच्या परंपरेला छेद देणारी घटना अशीच या साहित्यमेळ्याची नोंद इतिहासात होईल. मराठी रसिकांच्या सामूहिक इच्छाशक्तीला धाब्यावर बसवून होणाऱ्या या मेळाव्यामुळे अ. भा. मराठी साहित्य संमेलनच रद्द होऊ नये, अशीच रसिकांची इच्छा आहे. तसे करणे हा मराठी सरस्वतीउपासकांचा अपमान ठरेल.

या बातमीवर तुमचं मत मांडण्यासाठी इथे क्लिक करा.