रत्नागिरीत डिसेंबरमध्ये "मराठी साहित्य शारदा संमेलन'
रत्नागिरी, ता. २५ - अखिल भारतीय साहित्य महामंडळाने विश्व साहित्य संमेलन जाहीर केल्याने रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाने येत्या २६ ते २८ डिसेंबरदरम्यान अखिल भारतीय मराठी साहित्य शारदा संमेलनाची घोषणा अध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन यांनी केली.
संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक न घेता ज्येष्ठ साहित्यिक मंगेश पाडगावकर यांचे नाव घोषित होईल, असेही त्यांनी नमूद केले.
वाचनालयात ऍड. पटवर्धन यांनी पत्रकार परिषदेत अधिकृत घोषणा केली. कविवर्य मंगेश पाडगावकर यांना सन्मानपूर्वक अध्यक्षपद देण्याची सूचना प्राचार्य राम शेवाळकर यांनी केली. त्यानुसार श्री. पाडगावकर यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येईल, असे पटवर्धन यांनी सांगितले. येत्या आठवडाभरात बैठक घेऊन पुढील दिशा ठरवू, असेही त्यांनी सांगितले.
यंदा वाचनालयाने चांगल्या आर्थिक तरतुदीमुळे साहित्य संमेलनाचा प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार साहित्य महामंडळाच्या शिष्टमंडळाने पाहणी केली; मात्र सॅन फ्रान्सिस्को येथे संमेलनाची घोषणा झाली. त्यामुळे साहित्य क्षेत्रात वादळ उठले होते.
अखिल भारतीय साहित्य महामंडळाने वाचकांच्या, साहित्यिकांच्या भावना पायदळी तुडवून सॅन फ्रान्सिस्कोला संमेलनाचा दुर्दैवी निर्णय घेतला आहे; मात्र जिल्हा वाचनालयाने या भावना लक्षात घेऊन साहित्य शारदा संमेलन घेण्याचे ठरविले आहे. प्रकाशक परिषदेनेही या संमेलनाला सक्रिय पाठिंबा दर्शविला असून अनेकांचा सहभाग येथे लाभणार आहे, असे ऍड. पटवर्धन म्हणाले.
साहित्य महामंडळाने आपल्याला डावलले नसल्याचे ऍड. पटवर्धन यांनी ठामपणे सांगितले. सॅन फ्रान्सिस्को येथे विश्व संमेलनाची घोषणा करून महामंडळाने मनमानी कारभार केला आहे. यंदा संमेलन न होता विश्व संमेलन होणार असल्याने व ठाणे, परभणी येथे संमेलन होत नसल्याने संमेलनात डावलण्याचा प्रश्न उद्भवत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केवळ भांडवलदारांनी संमेलन "हायजॅक' केल्याची टीका ऍड. पटवर्धन यांनी केली.
डिसेंबरमधील साहित्य शारदा संमेलनात सर्व साहित्यिक आणि प्रत्येक सांस्कृतिक संस्थेला सहभागी करून घेतला जाणार आहे.
निधीसाठी शासनाकडे प्रस्ताव
सॅन फ्रान्सिस्को येथे विश्व मराठी साहित्य संमेलन होत असल्यामुळे त्या संमेलनासाठी शासनाकडून अनुदान मिळेल की नाही? याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. हा निधी अखिल भारतीय संमेलनासाठी असतो, त्यामुळे विश्व संमेलनाला दिला जाण्याबाबत शक्यता कमी आहे. त्यामुळे येथे डिसेंबरमध्ये होणाऱ्या संमेलनासाठी निधी मिळावा, असा प्रस्ताव वाचनालयातर्फे शासनाकडे येत्या दोन दिवसांत पाठविण्यात येणार आहे.
Saturday, July 26, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment