Monday, July 14, 2008

Letter from aai to sandeep in Bay Area on Saahitya Sammelan--Maha.Times news--item.

सॅन फ्रान्सिस्कोपर्यंत दुमदुमणारी मराठी साहित्य संमेलनाची दुंदुभी आता
चागलीच निनादू लागली आहे . या दिग्विजयाची मटानिवासी चकोराने आपल्या
उपरोधिक आणि काल्पनिक लेखणीने केलेली जम्माडीगंमत ...

.........................................

बे एरियातील संदीपने जाहीर केलं की आम्ही येथील मराठी श्रीमंत नाही ,
मध्यमवगीर्य आहोत . हे वाचून संदीपच्या आईने त्याला तातडीने मेल पाठवला .
तो असा :

चि . संदीप यास ,

अनेक आशीर्वाद

तुझी आथिर्क स्थिती ठीक नाही हे ' मटा ' वाचून कळलं . वाईट वाटलं .
म्हणजे आम्हाला हे पेपरातून कळावं याचं . आम्ही इतके वेळा तिकडे आलो ; पण
तू कधी याची आम्हाला कल्पनाही येणार नाही याची काळजी घेतलीस . लहानपणचा
तुझा स्वभाव गेला नाही , हेच खरं .

आता यापुढे येताना आम्हाला अधिक विचार करावा लागेल . कारण आमचा भार
तुझ्यावर पडणं आम्हाला योग्य वाटत नाही . तुमचा भलामोठा बंगला बघून
तुमच्या परिस्थितीची कल्पना येत नाही . बंगल्यात तुमच्या स्विमींग टँक ,
टेनिस कोर्ट , दोन मोटारी वगैरे बघून आम्हाला तुम्ही अंबानीच आहात असं
वाटलं होतं . गेला बाजार डीएसके वगैरे तरी .

आता तू साहित्य संमेलन भरवण्यात पुढाकार घेणार आहेस असं कळलं . काळजीच
वाटायला लागली आहे . इतक्या पाहुण्यांचा पाहुणचार करणं तुला परवडणार आहे
का ? त्यात या काही लेखक मंडळींच्या सवयी ऐकून आहे मी . त्या भारी जातील
तुला . तू आपला वरणभात जेवणारे लेखक तुझ्या घरी ठेवून घे . त्या
संयोजकांना म्हणावं बाकीच्यांची इतरांकडे सोय करा .

आता मला कळलं की सुनबाईला सगळी कामं स्वत : घरी का करावी लागतात हे !
तिला म्हणावं माहेरी पोळी भाजी करायला आणि कुकर लावायला शिकली असतीस तर
तुझे पोटाचे हाल कमी झाले असते . नेहमी नेहमी बाहेर बर्गर आणि कोक बरा
नव्हे . पोटाला आणि खिशाला .

तिच्या बाळंतपणासाठी मी यायचं की नाही याचा आता मला विचार करायला हवा .
उगीच तुझ्यावर आथिर्क भार नको . आधी आम्ही दोघेही येणार होतो .
आमच्यावरील खर्चापेक्षा तिकडे नोकरांवरील खर्च कमी असेल ना ! तसं असेल तर
खुश्शाल नोकर ठेवा .

हे म्हणतात की आता अमेरिकेत वाईट स्थिती आहे . संयोजकांना म्हणावं संमेलन
थोडं पुढे ढकला . उगीच दुष्काळात तेरावा महिना अशी गत व्हायची .

मी आले तरी येताना चितळेंची बाकरवडी आणि आंबा बर्फी नेहमीपेक्षा जास्त
आणेन . तितकंच बाहेरचं खाणं टळेल . सुनेला म्हणावं , निदान बाळासाठी तरी
किचनमध्ये लक्ष घाल .

तुझी आई .

- चकोर

No comments: