पॅरीसमध्ये सातव्या युरोपियन मराठी संमेलनाचे दिमाखदार उद्धाटन...
१८ जुलै २००८
अभय पाटील
जगभरातला मराठी माणूस शाश्वत विकासाच्या पालखीचा भोई होईल असा आशावाद प्राज उद्योगसमूहाचे अध्यक्ष प्रमोद चौधरी यांनी सातव्या युरोपियन मराठी संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी बीजभाषणात व्यक्त केला.
आर्थिक विकास आणि सामाजिक स्वास्थ्य यांचा सुवर्णमध्य गाठण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. यापुढे केवळ नफ्याच्या भाषेत उद्योगधंदे आपले यश मोजू शकणार नाहीत, तर नफा, पर्यावरण आणि समाज (profit, planet and people) या तीन निकषांवर उद्योगधंद्याचे व्यवस्थापन व्हायला हवे असे ते म्हणाले.
पॅरीसजवळ जुई आँ जोझासमधील पुरातन शातोमध्ये दीप प्रज्वलन आणि गणेशपूजा करून सातवे मराठी युरोपियन संमेलन सुरू झाले. पहिल्या सत्रात जर्मनीमध्ये शिकणाऱ्या अनुष्का गोखले, निषाद फाटक आणि अक्षय जोशी यांनी मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम सादर केला. सतरा परदेशी भाषा अस्खलित बोलणाऱ्या मुंबईच्या अमृता जोशीची मुलाखत सर्वांनाच चक्रावून टाकणारी होती.
संध्याकाळच्या सत्रात डॉ. मोहन आगाशेंनी श्रोत्यांशी संवाद साधला. मनोरंजनाची भूल देऊन शिक्षणाची शस्त्रक्रिया करण्याचं तंत्र आपण राबवतो असं त्यांनी यावेळी सांगितलं. परदेशातल्या मराठी रसिकांसमोर नव्या दमाची मराठी नाटकं आणण्याचा आपला प्रयत्न आहे, समन्वयचं "साठेचं काय करायचं' हा प्रयोग या उद्देशानंच युरोपियन मराठी मंडळींसमोर आणत आहोत असं ते म्हणाले.
राजीव नाईक लिखीत, संदेश कुलकर्णी दिग्दर्शित आणि अमृता सुभाष आणि निखिल रत्नपारखी अभिनीत नाटकाच्या प्रयोगानं संमेलनाच्या पहिल्या दिवसाची सांगता झाली.
Sunday, July 20, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment