Wednesday, July 23, 2008

Moves For New Marathi Saahitya Mahamandal(Sakaal News)

पर्यायी साहित्य महामंडळाचे रणशिंग फुंकले - मधू मंगेश कर्णिक

मुंबई, ता. १९ - "अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळा'चा कारभार हा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसारखा झाला असून महामंडळावर लुंग्यासुंग्यांचे वर्चस्व निर्माण झाले आहे.
मूठभर लोकांच्या मर्जीखातर साहित्य संमेलन सॅनफ्रान्सिस्कोला घेणारच असाल, तर तुमची ही दादागिरी मोडून काढू, असा घणाघाती हल्ला चढवीत ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांनी आज साहित्य महामंडळाला अखेरचे आवाहन करीत पर्यायी साहित्य महामंडळाचे रणशिंग फुंकले.

साहित्य महामंडळाच्या कार्यपद्धतीविषयी चर्चा करण्यासाठी आज दादर येथील अण्णासाहेब वर्तक सभागृहात कोकण मराठी साहित्य परिषद, जागतिक मराठी परिषद, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा आणि मराठी प्रकाशक संघटनेतर्फे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ""साहित्य संस्कृतीची श्रीमंती वाढविण्यासाठी देशातील सर्व साहित्य संस्था, वाचक, प्रकाशक, ग्रंथविक्रेते, महत्त्वाची ग्रंथालये आदी सर्व घटकांना महामंडळामध्ये सामील करून घ्यावे व त्यानुसार आवश्‍यक ती घटनादुरुस्ती करावी,'' असा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला.

या बैठकीत साहित्य महामंडळाच्या कार्यपद्धतीवर उपस्थित वक्‍त्यांनी सडकून टीका केली. मधू मंगेश कर्णिक म्हणाले की, ""एखाद्या पतपेढीच्या निवडणुकीची चर्चा व्हावी, तशी साहित्य संमेलनाची चर्चा होणे मराठी साहित्य क्षेत्राला शोभादायक नाही. साहित्यरसिक, प्रसारमाध्यमांचा दबाव वाढला म्हणूनच आता रत्नागिरीतही संमेलन घेण्यावाचून महामंडळाला पर्याय राहिलेला नाही. साहित्य संमेलन ही मराठी सारस्वतांची दिवाळी आहे. हा सण आमच्या घरातच व्हायला पाहिजे, वाटल्यास त्यानंतर अमेरिकेत एखादा साहित्य सोहळा घेण्यास आमची हरकत नाही.''

रामदास फुटाणे यांनी सांगितले की, अमेरिकेतील संमेलनाला माझा विरोध नाही; पण तसेच संमेलन रत्नागिरीतही व्हावे. नवीन महामंडळ स्थापन करण्याच्या भानगडीत कुणीही पडू नये, असा सल्ला त्यांनी दिला. सुभाष भेंडे यांनी हे संमेलन घटनाबाह्य असल्याचा आरोप केला. फाडफाड इंग्रजी शिकण्यासारखेच तीन दिवसांत मराठी शिका, असे सांगणारे हे संमेलन असल्याची खिल्ली त्यांनी उडवली. अरुण साधू यांनी संमेलनातील राजकारण्यांच्या सहभागाविषयी टीकेची झोड उठविली. काही राजकारणी सर्जनशील असतात, हे मान्य केले तरी साहित्यिकांनीही आपला कणा मोडू देऊ नये, आपल्याच मस्तीत राहावे, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी अर्जुन डांगळे, पु. द. कोडोलीकर, विजय चोरमारे, अशोक मुळ्ये, कृष्णकांत शिंदे यांचीही भाषणे झाली.
--------------------------------------------------------
"महामंडळाची घटना कालबाह्य'
महामंडळाची पन्नास-साठ वर्षांपूर्वीची घटना आता कालबाह्य झाली आहे. तिचा प्रवाह जुनाट झाला आहे. महामंडळाचा कारभार अधिक स्वच्छ आणि पारदर्शक करण्याचा शहाणपणा सुचेल, अशी अपेक्षा व्यक्त करीत मधू मंगेश कर्णिक यांनी साहित्यरसिकांना गावकुसाबाहेर ठेवण्याचा, साहित्यिकांत दुभंगलेपणा आणण्याचा अनुचित विचार करणाऱ्यांना नवीन पिढी फेकून देईल, असा इशारा दिला.
--------------------------------------------------------

No comments: