Sunday, August 3, 2008

Saahitya Sammelan In India In 2009

भारतातील संमेलन २००९ मध्ये होणारपुणे, ता. ३० - भारतातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन रद्द करण्याचा निर्णय झालेला नाही, तर योग्य वेळी म्हणजे २००९ मध्ये ते संमेलन घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे कळविण्यात आले आहे. शिवाय पहिल्या विश्‍व मराठी साहित्य संमेलनासाठी महामंडळाचे सर्व सदस्य स्वखर्चाने जाणार असल्याचेही परिषदेच्या पत्रकात म्हटले आहे. परिषदेच्या भूमिकेविषयी विविध माध्यमांतून उलटसुलट चर्चा सुरू असल्याच्या पार्श्‍वभूमीवर हे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. "मसाप'च्या पुण्याच्या, तसेच बाहेरगावच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी झाली. या बैठकीत परिषदेचे विश्‍वस्त, उपाध्यक्ष, पदाधिकारी, बाहेरगावचे प्रतिनिधी उपस्थित होते. महामंडळाच्या औरंगाबाद येथे झालेल्या बैठकीतील निर्णयांची माहिती या प्रसंगी प्रतिनिधींना देण्यात आली. अमेरिकेत होणारे विश्‍वसंमेलन हे अमेरिकेतील मराठी भाषक भरवीत आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ त्याच्या नियोजनात सहभागी होत आहे. मराठीचा झेंडा ते देशाबाहेर मिरवीत असल्याने मराठी भाषक म्हणून "मसाप'चे सदस्य व पदाधिकारी महामंडळाच्या सदस्यांना व पदाधिकाऱ्यांना या संमेलनासाठी पाठिंबा देत आहेत, असे या पत्रकात म्हटले आहे. या संमेलनासाठी महामंडळाचे सर्व सदस्य स्वखर्चाने जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. परिषदेचे अध्यक्ष प्रा. द. मा. मिरासदार यांनी "मसाप'ला दिलेल्या पत्रातही याला दुजोरा दिला आहे. ""संमेलन प्रामुख्याने मराठी रसिकांसाठी असल्याने ते महाराष्ट्रातीलच एका गावी भरविले जाण्यास अग्रक्रम द्यावा, तथापि सॅनफ्रान्सिस्को येथील मराठी बांधवांनी यासंबंधी दाखवलेला उत्साह आणि कळकळ ध्यानी घेऊन तेही निमंत्रण स्वीकारावे. महाराष्ट्रातील संमेलन हे अधिकृत ८२ वे संमेलन होईल आणि अमेरिकेतील संमेलनास "विशेष साहित्य संमेलन' म्हणावे, म्हणजे हा वाद मिटू शकेल. महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी ही सूचना विचार करण्याजोगी आहे, असे म्हटले आणि महामंडळाच्या आगामी बैठकीत काही दुरुस्त्यांसह ती ठेवतो, असे म्हटले. नुकतीच महामंडळाची बैठक झाली आणि महाराष्ट्रातील संमेलनाचा अग्रक्रम मान्य करून ते २००८ ऐवजी २००९ मध्ये घ्यावे, असे म्हटले; कारण २००८ मध्ये सांगली येथे संमेलन होऊन गेले आहे. शासकीय आर्थिक वर्ष २००९ च्या मार्चमध्ये संपेल. त्यानंतर हे संमेलन भरल्यास या संमेलनास योग्य ते शासकीय आर्थिक अनुदान मिळू शकेल,'' असे मिरासदार यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. "विश्‍व साहित्य संमेलन' म्हणावे! ""सॅन होजे येथील मराठी मंडळींना हे संमेलन येत्या फेब्रुवारीमध्ये आवश्‍यक वाटते, म्हणून ते फेब्रुवारीस ठरवावे. ते तेथील मराठी मंडळाने भरवावे. मराठी साहित्य महामंडळाने फक्त त्यांना योग्य ते सहकार्य करावे. या संमेलनास "विश्‍व साहित्य संमेलन' म्हणावे, म्हणजे घटनात्मक कुठलीही अडचण येणार नाही. मंडळाचे जे सदस्य या विश्‍व संमेलनास जातील, त्यांनी स्वखर्चाने जावे, असेही ठरले आहे,'' असा उल्लेखही मिरासदार यांनी पाठविलेल्या पत्रात आहे.

No comments: